मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी)च्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्यामुळे डॉक्टरांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे बनावट संकेतस्थळ एक ते दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtramedicalcouncil.org.in/ असे आहे, तर एमएमसीच्या नावाने बनविलेल्या बनावट संकेतस्थळामध्ये फक्त ई या इंग्रजी अक्षराचा फरक केला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचा पत्ता https://www.maharashtramedicalcouncile.in/ असा असून, त्यामध्ये ‘Council’ या शब्दाचे स्पेलिंग बदलून ‘Councile’ असे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हे संकेतस्थळ अधिकृत असल्याचा भास निर्माण होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
बनावट संकेतस्थळावर ‘एमएमसी मेंबर्स’ या पर्यायावर क्लिक केल्यास प्रशासक म्हणून डॉ. विंकी रुघवानी यांचा फोटो दिसतो. तसेच संकेतस्थळावर ‘आरएमपी लॉगिन’ हा सक्रिय पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये डॉक्टरांकडून वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द मागविले जातात. सायबर फसवणूक करणाऱ्यांसाठी ही माहिती मिळविणे हा प्रमुख उद्देश असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या संकेतस्थळावर ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे डॉक्टरांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ‘केवायडी’ या पर्यायावर क्लिक केल्यास अधिकृत आणि अस्सल केवायडी संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाते. त्यामुळे संकेतस्थळ अधिकृत असल्याचा आभास निर्माण होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. हे बनावट संकेतस्थळ तयार करून एक ते दोन महिने उलटले आहेत. त्यामुळे या संदर्भात सायबर गुन्हे शाखेकडून तातडीने तपास करून संकेतस्थळ बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. एमएमसीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट संकेतस्थळाबाबत एमएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. त्याच्या मुख्य पृष्ठावरच बनावट संकेतस्थळाबाबत डॉक्टरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नावाने उपलब्ध असलेल्या कोणत्याही संकेतस्थळावर लॉगिन करण्यापूर्वी त्याचा वेब पत्ता काळजीपूर्वक तपासावा, अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा ऑनलाइन शुल्क भरताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी कळले, त्याच दिवशी आम्ही एमएमसीच्या वेबसाईटवर नोटीस अपलोड केली. यामध्ये बनावट वेबसाईटची माहती देत डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही केली आहे. बनावट संकेतस्थळ उघडल्यावर फक्त एकच पेज उघडले जाते. परंतु ते पुढे जात नाही किंवा त्यामध्ये काहीही होत नसल्याने डॉक्टरांचे नुकसान होण्याचा धोका कमी आहे. परंतु काळजी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.






