मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत मुंबईतील पहिलाच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जोगेश्वरी येथील मजासवाडीतील साईबाबा वेल्फेअर झोपडपट्टीत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे अनेक प्रकल्प रखडले असून काही विकासकांनी कामे अर्धवट सोडल्याने झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन लांबले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रखडलेले प्रकल्प विविध सरकारी यंत्रणांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार म्हाडाकडे सुमारे २१ प्रकल्प हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ तीन ते चार प्रकल्पच पुढे नेणे शक्य झाले. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने २२८ पैकी १८१ योजना संबंधित यंत्रणांकडून परत घेतल्याने सध्या म्हाडाकडे मोजकेच प्रकल्प शिल्लक आहेत. जोगेश्वरीतील साईबाबा वेल्फेअर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी बी. जी. शिर्के आणि स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामध्ये स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरची ४५ कोटी रुपयांची निविदा अंतिम ठरल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निविदेला मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश जारी करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पात ७८ मूळ झोपडीधारक आणि एक व्यावसायिक गाळ्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका, बालवाडी, सोसायटीचे कार्यालय आणि इतर आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. मूळ रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर म्हाडाला सोडतीसाठी ११९ घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ३७.३१ चौरस मीटरच्या ६६, ३९.३० चौरस मीटरच्या १८, ५२.२२ चौरस मीटरच्या १८ आणि २८.९० चौरस मीटरच्या १७ सदनिकांचा समावेश असेल.






