पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समजलीये. अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. मुंबईतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ससूनमध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात या आरोपींचा हाथ होता, अशी माहिती पोलीस तपासात समजली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी २ आरोपींची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात झालेल्या अपघातानंतर तपासात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. ते तपासण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, रक्त्त्याच्या नमुन्यात फेरफार झाले. फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ही संशियत आरोपी होती. शिवानीने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कट रचल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करत शिवानी अग्रवालला देखील ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाच्या रक्ताच्या नमुन्या ऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुली शिवानीने स्वतः पोलिसांना दिली. त्यानंतर याप्रकरणात आता पुन्हा अन्य दीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.