बदलापूर : माझ्या मुलाने काहीं चूक केली असेल तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. माझ्या मुलाने त्या मुलींवर अत्याचार केले असावे असे मला वाटत नाही. आरोपीने गेल्या २ वर्षात तीन वेळा लग्न केले असून त्याची तिसरी पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. तर आरोपी अक्षयची आई त्याच शाळेत वेगळ्या विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करते. अक्षय शिंदेचा छोटा भाऊ शाळेमध्ये नोकरी करत होता. तो वेगवेगळ्या विभागात शिपाई झाला. त्यानंतर त्यानेच अक्षयला या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावले. आरोपी अक्षय शिंदे बदलापूरच्या खरवई गावात आई, वडील, लहान भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहतो. शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी अक्षय राहत असलेल्या खरवई गावातील त्याच्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. त्याच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी खरवई गावातील त्याच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यापूर्वी अक्षय त्याच्या आईसोबत एका हाऊसिंग सोसायटीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. आरोपीचे वय २४ वर्षे असले तरी देखील त्याचे तीन वेळा लग्न झाले आहे. आरोपीच्या पहिल्या दोन बायका लग्नानंतर लगेच सोडून गेल्या, त्याने तिसऱ्यांदा लग्न केले असून त्याची पत्नी गरोदर आहे. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असून तो घटना घडलेल्या बदलापूरमधील त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. एका कंत्राटाद्वारे त्याला या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती. दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणात आरोपी दोषी आढळला तर त्याला साडेतेरा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.