वृत्तसंस्था : ८ सप्टेंबर २०२६ पासून लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp काही जुन्या स्मार्टफोन्सवर कार्य करणे बंद करणार आहे. कंपनीकडून सॉफ्टवेअर सपोर्ट संपवण्यात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ज्या Android फोनमध्ये Android 6.0 Marshmallow पेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तसेच iPhone वापरकर्त्यांकडे iOS 15.1 पेक्षा जुने व्हर्जन असल्यास त्या डिव्हाइसेसवर WhatsApp चालणार नाही. त्यामुळे लाखो युजर्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
युजर्सनी आपले WhatsApp चालू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्वरित तपासणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, फोनचे सॉफ्टवेअर व्हर्जन Settings मधील “About Phone” मध्ये जाऊन तपासावे. जर डिव्हाइस जुने असेल, तर उपलब्ध असल्यास सिस्टम अपडेट करून नवीन व्हर्जन इन्स्टॉल करावे. तसेच, महत्त्वाचे मेसेज गमावू नयेत म्हणून Chat Backup घेणे अत्यावश्यक आहे, जे Google Drive किंवा iCloud वर सेव्ह करता येते. जर फोन अपडेट होण्यास सक्षम नसेल, तर WhatsApp वापरणे सुरू ठेवण्यासाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा पर्यायच उरेल.






