मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) स्वतंत्र रांगा लावल्या जात असल्याने दर्शन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना व्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करत मुंबई डबेवाला असोसिएशनने व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात.
यंदाही लालबागच्या राजाच्या दरबारात मोठी गर्दी होत असून, दर्शनासाठी भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे डबेवाला संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, व्हीआयपी दर्शनावरून भाविक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याच्या काही चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातच पुण्याहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या २५ वर्षीय तरुणाचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आदरपूर्वक वागणूक दिली जाते, हा भेदभाव अयोग्य असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे. अभिनेते, कलाकारांना गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विशेष सोय केली जाते. त्यांचे समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान आहे, अशी टीकाही त्यांनी केली. धर्मादाय आयुक्तांनी लक्ष घातल्यास हे प्रकार थांबू शकतात, असेही तळेकर यांनी सांगितले.






