मुंबई : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या अडचणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज पडून बैल दगावल्यामुळे शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांना बैलाच्या जागी जोखडाला जुंपण्याची वेळ आली होती. या घटनेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या समन्वयातून लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना आवश्यक मदत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महसूल, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या यंत्रणा तातडीने गायकवाड कुटुंबापर्यंत पोहोचल्या. काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई हे बैलजोडीच्या मदतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मशागत, नांगरणी, पेरणी आणि वखरणीची कामे करून उदरनिर्वाह करतात. मात्र ५ जून रोजी झालेल्या वादळी पावसात वीज पडून त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले होते.
प्रशासनाने तातडीने हालचाल करत पशुसंवर्धन विभागामार्फत नवीन बैल उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बैल गायकवाड कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे आगामी खरीप हंगामातील कामांची चिंता दूर झाली असून कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल हौसाबाई गायकवाड आणि त्यांचा मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. हौसाबाई यांनी मिळालेला बैल चांगला असून त्याची योग्य काळजी घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक सहाय्य देण्याच्या नियमानुसार दगावलेल्या बैलाचा पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार मंजूर झालेली नुकसानभरपाईची रक्कम थेट गायकवाड यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.







