मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण सुरू केले आहे. १ जून २०२६ पासून महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा विषय मुंबईत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, महापौर रितू तावडे यांनी बांग्लादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाईची भूमिका जाहीर केल्यानंतर या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बहुचर्चित क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मुंबईतील एकूण ९९ हजार ४३५ नोंदणीकृत पथविक्रेत्यांपैकी सुमारे २० हजार विक्रेत्यांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित विक्रेत्यांनी २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करून ओळखपत्र प्राप्त करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी संबंधित विभाग कार्यालयांमध्ये नावासह प्रदर्शित करण्यात आली असून ती स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटनांचे प्रतिनिधी आणि निवडून आलेल्या पथविक्रेता प्रतिनिधींनाही देण्यात आली आहे. तसेच अर्जामध्ये नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून पथविक्रेत्यांना पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. पडताळणीसाठी अर्जाची पोचपावती, आधारकार्डाची मूळ प्रत आणि दोन पारपत्र आकाराची छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निश्चित मुदतीनंतर पडताळणी अथवा क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण करता येणार नाही. त्यामुळे सर्व पात्र आणि नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत ओळखपत्र प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






