पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक, मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत आरोग्य विभागाने वारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत एकूण ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली असून, त्यापैकी ३ लाख ८० हजार ४८५ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच ३ हजार १५८ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली असून, अधिक उपचारांची गरज असलेल्या ८८३ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, तीन दिवसांचे महाआरोग्य शिबिर आणि यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण ठरलेली एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय, वारकऱ्यांच्या आरोग्याचे सर्वंकष संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीपर उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, तर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने सुरू आहेत. पालखी मार्गावरील हॉटेल, भोजनालये आणि धाब्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात असून, अन्न सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आला आहे. वारी संपल्यानंतर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती आणि आवश्यक सल्ला देण्याचे कामही सुरू आहे. याशिवाय, ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीच्या आरोग्य सुविधा, जवळच्या वैद्यकीय केंद्रांची माहिती आणि आवश्यक सेवा सहज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग वारीच्या संपूर्ण कालावधीत पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेला साजेशी आरोग्य व्यवस्था उभारून वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.






