मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना या मार्गावर वसई पनवेल रोहा मार्गे आणि विश्वामित्री कुडाळ या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. पश्चिम रेल्वेनं ४० गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २४८ वर पोहोचली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेनं कोकणात जाण्यासाठी ५२ गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी विशेष एक्स्प्रेसच्या ३० फेऱ्या धावणार आहेत. १४ ते १८ आणि २० ते ३० सप्टेंबर यादरम्यान ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दर सोमवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री १२ वाजता सुटून पहाटे तीन वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी १५ ते १९ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर ते एक ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून मुंबई सेंट्रलला त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता पोहोचणार आहे.
उधना ते मडगाव (सहा फेऱ्या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (चार फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेचे थांबे पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी या स्थानकांदरम्यान सावंतवाडी विशेष गणपती फेस्टीवल ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान चालवली जाईल. या ट्रेनला २४ कोच असीतल. या ट्रेन वसई-पनवेल- रोहा मार्गे चालवल्या जातील. साप्ताहिक गणपती विशेष ट्रेन उधना ते मडगाव. उधना ते मडगाव ही साप्ताहिक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी १५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान उधना ते मडगाव अशी सुरु राहील. तर, मडगाव ते उधना १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान सुरु राहील. ही ट्रेन देखील वसई पनवेल रोहा मार्गे जाईल. या ट्रेनला २२ कोच असतील. विश्वामित्री कुडाळ विशेष एक्स्प्रेस १८ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान सुरु राहील. तर, कुडाळ ते विश्वामित्री अशी सेवा १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान सुरु असेल. या ट्रेनला २२ कोच असतील. ही ट्रेन देखील वसई- पनवेल- रोहा मार्गे धावेल.