ठाणे : आसनगाव रेल्वे स्थानकावरील मालगाडी खाली आल्याने महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे. मालगाडी महिलेच्या अंगावरून गेल्याने महिलेचे हात-पाय धडावेगळे झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या वाखारीकर ( वय ५३, रा. आसनगाव ) असे अपघातात हात- पाय गमावून बसलेल्या महिलेचे नाव आहे. त्या रुग्णालयात नर्सचे काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार विद्या वाखारीकर या शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे कुटूंबासह राहतात. त्या मुंबईतील सायन भागात असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्या नोकरी निमित्त आसनगाव ते सायन रेल्वेस्थानकापर्यत लोकलने प्रवास करतात. नेहमी प्रमाणे रुग्णालयात सकाळची ड्युटी असल्याने त्या कसाऱ्याहून आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी येणाऱ्या कसारा लोकलने मुंबईला जात होत्या.
आसनगाव रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पूर्वेला पादचारी पूल आहे. स्टेशनवर जाण्यासाठी वळसा न घेता, रुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खालून पटकन फलाटावर उतरता यावे म्हणून वाखरीकर मालगाडी खाली घुसल्या. त्याच वेळी मालगाडी सुरू झाली. मालगाडी त्यांच्या डाव्या हातावरुन तसेच डाव्यापायावरुन गेल्याने हात तसेच पाय धडावेगळे झाले. हे पाहून मुलाने इतर प्रवाशांच्या मदतीने आरडाओरडा केली. गंभीर जखमी झालेल्या वाखरीकर यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात, नंतर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. शिवाय, त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार अनिता झोपे यांनी सांगितले.