पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून, त्यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेऊन कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर विवाहासंदर्भातील धार्मिक समजुतींबाबत मार्गदर्शन घेतले. यावेळी पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भातील कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली. समाजात कुटुंबातील आई किंवा वडिलांचे निधन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत विवाह करावा, अन्यथा पुढील तीन वर्षे लग्नकार्य करता येत नाही, अशी प्रचलित समजूत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून धर्मशास्त्रीय भूमिका जाणून घेण्यात आली. करवीर पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संबंध असल्याने या विषयावरील परंपरा, रूढी आणि धार्मिक संदर्भ स्पष्ट करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले. शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर आवश्यक धार्मिक विधी आणि संस्कार योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे असले, तरी एका वर्षाच्या आत विवाह करणे धर्मशास्त्रानुसार बंधनकारक नाही. त्यामुळे या संदर्भात समाजात असलेल्या गैरसमजांना बळी पडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली.
याच वेळी पार्थ पवार यांच्या विवाहाचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडणार असून, त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे विवाहसोहळा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असल्याची माहितीही देण्यात आली. मागील काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या नावाबाबत आणि जन्मस्थळाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबतही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले. या घोषणेमुळे पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भातील विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विवाहसोहळा बारामती येथे पारंपरिक पद्धतीने पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.






