विरार : वसई-विरार, नालासोपारा परिसरात घरफोडी करून, गुजरातमध्ये फरारी होणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या गुजराती टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून एक लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दीपक भाकीयदार ऊर्फ बोबड्या (वय २८), मोहमद तारिक ऊर्फ टिंकल (वय ३२) आणि धर्मेंद्र पासवान (वय ३५) अशी अटक संशयित आरोपींची नावे असून, हे तिघेही गुजरातमधील राहणारे आहेत. दीपक आणि मोहमद हे सराईत गुन्हेगार आहेत. गुजरातमधील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दीपकवर १३, तर मोहमद याच्यावर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ९ फेब्रुवारीला या टोळीने विरार पश्चिम परिसरातील विठ्ठल हरी टॉवरमधील आनंद भवरलाल जैन यांच्या घराच्या हॉलची खिडकी तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होती. त्यांनी आरोपींचा शोध घेतला असता ते गुजरातमधील असल्याचे समोर आले. त्यानुसार गुजरातमध्ये सापळा रचून या तीन आरोपींचा भांडाफोड केला. विरार पोलिसांनी त्यांच्याकडून १२.५२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल, ३३ हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.