वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेई संघाचा २६-२५ असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. कबड्डीचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. या सुवर्णासह भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत देशाने प्रथमच १०० पदके जिंकली आहेत. भारतीय क्रीडा जगतासाठी हे चांगले संकेत आहेत. भारत आणि चायनीज तैपेई महिला संघ यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. सुरुवातीला टीम इंडियाने आघाडी घेतली होती, मात्र नंतर चायनीज तैपेईने शानदार पुनरागमन केले आणि ९ मिनिटे शिल्लक असताना भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे विरोधी संघाने आघाडी घेतली. अशा स्थितीत स्कोअर २२-२२ असा बरोबरीत पोहोचला होता. मात्र, अखेरच्या क्षणी भारताने पॉइंट मिळवत सामना २६-२५ असा जिंकला.
शनिवारची सकाळ भारतीय संघासाठी सुवर्णपदक घेऊन आली. शनिवारी महिलांच्या तिरंदाजीत देशाने पहिले सुवर्ण जिंकले. यामध्ये ज्योती याराजीने भारतात सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर ओजस देवतळने पुरुष गटात आणखी एक सुवर्णपदक पटकावले. या दोघांशिवाय भारताने तिरंदाजीमध्ये कांस्य आणि रौप्यपदक जिंकले, ज्यामुळे देशाने १०० पदकांचा जादुई आकडा पार केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके पूर्ण करणे ही एक महत्त्वाची कामगिरी असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, १० ऑक्टोबर रोजी भारतीय तुकडीचे स्वागत करणार आहे. पंतप्रधान मोदीं ट्विटरवर पोस्ट करताना म्हणाले, “प्रत्येक आश्चर्यकारक कामगिरीने इतिहास रचला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० ऑक्टोबर रोजी आमच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचे स्वागत करीन आणि खेळाडूंशी चर्चा करेन.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही १०० पदकांचा पराक्रम केला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ते म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक महत्त्वाची कामगिरी. मी आमच्या प्रतिभावान खेळाडूंचे अभिनंदन करतो, ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली.”