पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले एक हजार ३९७ मतदार; तर ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या २६५ मतदारांनी घरीच टपाली मतदान करण्याची सुविधा मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या, तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन टपाली मतदानावर भर दिला जात आहे. अशा मतदारांची यादी निश्चित करून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन टपाली मतदान करणार की मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार याबाबतची माहिती घेतली. यामध्ये अनेकांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगितले. काहींनी टपाली मतदान करणार असल्याचे सांगितले. अशा मतदारांकडून १२-ड अर्ज भरून घेतला आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या मतदारांना टपाली मतदानाचा लाभ घेता येणार आहे. मतदानासाठी अधिकाऱ्यांना संबंधितांच्या घरी पाठवून त्यांचे मत नोंदविले जाणार आहे. या कामकाजासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्यासाठी विधानसभानिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी व्हिडिओग्राफर व पोलिस यांचा पथकामध्ये समावेश असणार आहे. गोपनीयतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने टपाली मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नमुना १२ डी फॉर्म मुदतीत भरून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुविधेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत राहतील. बारामती लोकसभा मतदार संघात १ ते ३ मे रोजी सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचपर्यंत, मावळ, पुणे व शिरूर मतदारसंघात सात ते नऊ मे रोजी सकाळी नऊपासून ते सायंकाळी पाचपर्यंत टपाली मतदान केंद्रे कार्यरत राहतील, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.