मुंबई : कुर्ला पश्चिम येथे नाकाबंदीदरम्यान एटीएमसाठी रोकड घेऊन जाणारी एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या गाडीत पोलिसांना पावणेदोन कोटी रुपये रोकड सापडली. विनोबा भावे नगर पोलिसांनी सदर गाडी आणि दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी कुर्ला पश्चिम परिसरात नाकाबंदी केली होती. त्यावेळी तेथे एटीएमसाठी रोकड नेणारी एका गाडी आली. या गाडीत दोनच इसम असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तत्काळ गाडी बाजूला घेण्यास सांगितली. त्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात पावणेदोन कोटी रुपयांची रोकड आढळली. विनोबा भावे नगर पोलिसांनी अधिक चौकशीसाठी संबंधित गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती आयकर विभाग आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.