पुणे : राजकीय वर्तुळातून बातमी समोर आली आहे. आचारसंहिता भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट मिळाली आहे. आचारसंहिता भंग झाली नाही, असा निर्वाळा देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याबद्दल दिला आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं, असंही क्लीनचिटमध्ये म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे. १७ एप्रिल रोजी अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात एक भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका केली होती. तसेच आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली होती. ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटण दाबा.’, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
निवडणूक आयोगाने या तक्रारीनंतर चौकशी केली तेव्हा प्राथमिक तपासात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव अजित पवारांकडून घेण्यात आले नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही, असं निवडणूक आयोगाने क्लीनचिट अहवालात नमूद केलं आहे.