मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहताना दिसून येतायत. प्रत्येक पक्षाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. निवडणूक आयोगाकडूनही तयारी केली जातीय. त्यातच लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसली असून एक मोठा डाव आखलाय. भारतीय जनता पक्षाने दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खेळी केलीय. या जागेवर भाजपने दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आलीय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. याठिकणी अरविंद सावंत यांच्याविरोधात राहुल नार्वेकर मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येतंय.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्गीय आणि मुस्लिम नागरिकांचे प्राबल्य आहे. या भागात मराठी उमेदवार अनेकवेळा निवडून आलाय . शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचे सांगितलं जातंय. राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणापासून सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या निर्णयाने राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलून गेल्याचे दिसतंय.
राहुल नार्वेकर हे कोकणी , मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज झालंय. त्या अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रम घेण्यासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे आता याठिकाणी कोण निवडून येणार हे पाहणं गरजेचं आहे.