नवी मुंबई : वाशीतील जुहू गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून अटक केली. या कारवाईत तीन पुरुष व एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. जुहू गावातील शांती निवास इमारतीमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने जुहू गावातील शांती निवास इमारतीतील तिसऱ्या माळ्यावरील संशयित घरावर छापा मारला. या वेळी रफिक समद शेख (४८), आलामीन रफिक शेख (२२) यामीन रफिक शेख (२०) व अकोली रफिक शेख (२०) हे चौघे बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ गावाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून भारतात बेकायदा प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे.