पुणे : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रीपद मिळविण्यासाठी महायुतीतील तीनही पक्षातील आमदारांनी ‘लॉबी’ लावण्यास सुरुवात केली असताना पुण्याचे पालकमंत्री कोण यावरून पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये पैज सुरू झाली आहे. पुण्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून शहरात फलक लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे पालकमंत्रीपदी ‘अजित दादा’ कायम राहणार अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडणे महत्वाचे आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक काळ अजित पवार यांनी भूषविले आहे. २०१४, आणि २०२२ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री कै. गिरीश बापट, विद्यमान तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूषविले आहे. पालकमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावर नियत्रंण ठेवणे हेसुद्धा शक्य असते.
याशिवाय जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीवर कार्यकर्त्यांची वर्णी लावता येते. महायुती सरकारच्या काळात काही दिवस चंद्रकांत पाटील यांचे हे पद होते. मात्र, अजित पवार यांनी आग्रह धरल्याने त्यांना हे पद देण्यात आले होते. मागील अडीच वर्षांत अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर काम करताना मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्यांनी पुणे जिल्ह्याचे कारभारी म्हणून या निवडणुकीत मान मिळविला आहे. पुणे जिल्हयात अजित पवार यांनी ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावर अजित पवारांचा दावा या वेळी कायम राहणार आहे. मात्र, ऐनवेळी महायुतीमध्ये काही वेगळा निर्णय झाला, तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही चंद्रकांत पाटील यांच्याकडे येऊ शकते. आगामी काळात पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद आपल्या ताब्यात असणे गरजचे असल्याचे मानले जात आहे.