ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत २४४ उमेदवार निवडणूक लढवित होते. या उमेदवारांपैकी ११७ उमेदवारांना पाचशेहून कमी मते मिळाली आहेत. यापैकी अंबरनाथ मतदारसंघातील १७ उमेदवार आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघातील १६ उमेदवारांना ५०० हून कमी मते मिळाली. अंबरनाथमध्ये २२ तर कल्याण पश्चिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित होते. तर जिल्ह्यात एक हजाराहून कमी मते मिळालेले उमेदवार ३० इतके आहेत.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह मनसे, एमआयएम, बसपा, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर संघटना आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. परंतु जिल्ह्यातील ११७ उमेदवारांना पाचशे मतांची संख्या देखील पार करता आली नाही. यातही काही उमेदवारांना १०० हून कमी मतदान झाले आहे. तर ३० उमेदवारांना ५०१ ते एक हजार इतके मतदान झाले आहे. अंबरनाथ मतदारसंघातील २२ पैकी १७ उमेदवारांना ५०० पेक्षा कमी मतदान झाले आहे. तसेच कल्याण पश्चिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित होते. यातील १६ जणांना पाचशे किंवा त्यापेक्षा कमी मतदान झाले आहे. मिरा-भाईंदर मतदारसंघातही ११ आणि उल्हासनगर मतदारसंघातील १० उमेदवारांना पाचशेहून कमी मतदान झाले आहे.