मुंबई : गिरगाव चौपाटी येथे कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या संदर्भात कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन आपली भूमिका आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर लोढा यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. कोळी बांधवांशी समन्वय साधून सहकार्याची भूमिका घ्यावी आणि कोणतीही कारवाई करताना त्यांच्या उपजीविकेचा तसेच पारंपरिक हक्कांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती देण्यात आली. गिरगाव चौपाटी परिसर हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग असून येथे कोळी समाज अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने आपली उपजीविका करत असल्याने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी विकासकामे आणि स्थानिकांच्या हक्कांमध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. “गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांच्यात संवाद आणि समन्वय राखूनच या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. जोपर्यंत कोळी बांधवांना योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या जडणघडणीत कोळी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत त्यांच्या उपजीविकेचा आणि पारंपरिक हक्कांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या प्रकरणात सर्व संबंधित घटकांमध्ये संवाद वाढवून सकारात्मक तोडगा काढण्यास प्राधान्य दिले जाईल आणि लवकरच मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






