पुणे : लोकसभेचा गुलाल खाली पडताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून बैठकाचा धडाका सुरु आहे. दुसरीकडे विधानसभेसाठी इच्छुकांनी देखील लगबग सुरु केली आहे. लोकसभेची निवडणूक वंचितच्या तिकीटावर लढवणारे वसंत मोरे आता शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत. मोरे हे पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडे खडकवासला विधानसभेचं तिकीट मागितलं आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. भीमराव (आण्णा) धोंडिबा तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना या मतदारसंघातून तिकीट मिळणार का? याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाने पुण्यातील दोन मतदारसंघावर दावा केला आहे. यामध्ये खडकवासला आणि कोथरूडचा समावेश आहे. खडकवासला येथून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत. तर कोथरूडमधून 3-4 नावांची चर्चा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वसंत मोरे यांनी हडपसरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. यंदा मात्र त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.