कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवलीसह आजूबाजूच्या गावामध्ये नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या पाणी टंचाईच्या समस्येबाबत निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी केडीएमसीच्या आय प्रभागावर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवली गावांसह आसपासच्या परिसरात नागरिक कमी दाबाने व अपूर्ण स्वरूपात होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी आंदोलने केली,
निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र पाणी समस्या सुटली नाही. यामुळे आज शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महिलांनी केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढला. महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्याला घेराव घालत पाण्याच्या समस्यांबाबत जाब विचारला. पाण्याची समस्या लवकर सुटली नाही, तर एकही अधिकाऱ्याला खुर्चीत बसून दिले जाणार नाही, केडीएमसी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी प्रभागातील अधिकाऱ्याला दिला आहे.