वृत्तसंस्था : आयपीएल २०२६ च्या हंगामातील ७० लीग स्टेज सामने पूर्ण झाले आहेत. रविवारी खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करुन प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याच्या संधीवर राजस्थानने पाणी फेरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ अधिकृतपणे आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. आयपीएलचा फायनल गाठण्यासाठी आता प्लेऑफमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कधी, केव्हा अन कुठे रंगणार हे सामने जाणून घेऊयात. बीसीसीआयने प्लेऑफचे वेळापत्रक आधीच निश्चित केले आहे. आयपीएल प्लेऑफचे सामने २६ मे रोजी सुरू होतील आणि अंतिम सामना ३१ मे रोजी होणार आहे. हे सामने धर्मशाळा, न्यू चंदीगड आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. सर्वप्रथम क्वालिफायर १, त्यानंतर एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ होतील. शेवटी, उरलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतील. आयपीएल २०२६ चा पहिला प्लेऑफ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना २६ मे रोजी धर्मशाळा येथे होणार आहे. विजयी संघ थेट फायनल सामना खेळेल. तर, पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल आणि तो क्वालिफायर २ चा सामना खेळेल. आयपीएल २०२६ प्लेऑफचा दुसरा सामना एलिमिनेटर असेल. हा सामना २७ मे रोजी न्यू चंदीगड येथे सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल. तर, विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल. हा सामना नॉकआउट सामना असेल. आयपीएल २०२६ चा दुसरा क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना न्यू चंदीगड येथे आयोजित केला जाईल. एलिमिनेटरचा विजेता आणि क्वालिफायर १ मधील पराभूत संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. आयपीएल २०२६ प्लेऑफचे सर्व सामने सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.
आयपीएल २०२६ प्लेऑफ वेळापत्रक :
• २६ मे (मंगळवार) – क्वालिफायर १ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स
• २७ मे (बुधवार) – एलिमिनेटर – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
• २९ मे (शुक्रवार) – दुसरा क्वालिफायर सामना
• ३१ मे (रविवार) – अंतिम सामना







