मुंबई : उपनगरातील मुलुंड परिसरात एका ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुशाल दंड (वय ६७) असे या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीमधील पार्किंगवरुन झालेल्या भांडणातून विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन, अशी महिलेने धमकी दिल्याने खुशाल दंड यांनी लोकल ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ते आणि या प्रकरणातील आरोपी कुमकुम मिश्रा या मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या मनीषा प्राईड इमारतीमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये पार्किंगवरुन वाद झाला होता. यात कुमकुमने दंड यांना मारहाण करीत धमकावले होते. तसेच दंड यांना मी पोलिसांत तुमच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करेन, अशी धमकीही दिली होती.
या घटनेनंतर खुशाल दंड प्रचंड अस्वस्थ झाले होते. याच ताणातून खुशाल दंड यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच कुमकुम मिश्राला अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. पार्किंगसारख्या क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण, त्यात महिलेने विनयभंग केल्याची दिलेली धमकी यामुळे धक्का बसलेल्या दंड यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले. यामुळे आता त्यांची पत्नी एकटी पडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.