ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेनं १५ ऑगस्टला महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षांसह चिकन मटन व्यापारी असोसिएशननं देखील कडाडून विरोध केला. केडीएमसी मात्र या विरोधाला झुगारून आपल्या निर्णयावर ठाम आहे. केडीएमसीकडून विरोध करणाऱ्यांना मटण चिकन विक्रीवर बंदी आहे, खाण्यावर बंदी नाही, असं सांगत १९८८च्या आदेशाची प्रत दाखवली जात आहे. 1988 साली तत्कालीन प्रशासकानं हा आदेश काढला आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणाच्या दिवशी चिकन मटन विक्रेत्यांना दुकानं बंद ठेवण्याच्या नोटीस दिल्या जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे. तर दुसरीकडं गेल्या दोन दिवसांपासून राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतायत, तर मटन चिकन विक्रेते, खाटीक समाजाकडून केडीएमसीला निवेदन देण्यात आलं आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून १५ ऑगस्ट निमित्तानं शहरातील चिकन मटन विक्री दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले. केडीएमसीच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरत उमटल्याचं पाहायला मिळालं. उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसीच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवलाय. दुसरीकडं स्थानिक पातळीवर देखील विरोधी पक्षानं या निर्णयाचा कडाडून विरोध केला. खाटीक समाज आणि महाराष्ट्र राज्य मटन चिकन विक्रेता असोसिएशननं देखील महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत हा निर्णय मागं घेण्याची मागणी केली. याबाबत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “१९८८ च्या आदेशाची मटण चिकन विक्रीवर बंदी आहे. खाण्यावर बंदी नाही, कुणी संभ्रम निर्माण करू नये. १९८८ पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु असून हा नव्यानं काढलेला आदेश नाही. आजवर कधीही कोणीही याला विरोध केलेला नाही. बदलत्या परिस्थितीनुसार आदेश बदलले जातात,” असं महापालिकेच्या भूमिकेबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी संगितलं. तर व्यापारी संघटनांनी, “दरवर्षी आम्ही मनपानं दिलेल्या नोटीसचा आदर करतो. परंतु यावर्षी काही राजकारण्यांनी या विषयावर भूमिका घेत आम्हीही उग्र आंदोलन करू, अशा बातम्या पसरवल्या. व्यापाऱ्यांचा विरोध नाही, परंतू आयुक्त यांच्याकडं एकच विनंती आहे, आमच्याकडं लक्ष द्या,” अशी विनंती मांस विक्रेत्यांनी केली आहे.







