मुंबई : प्रकृती अस्वस्थतेमुळे फलाटावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रवाशाला मदत करण्याऐवजी लोकलमधील मालडब्यात टाकणाऱ्या रेल्वे पोलिस नाईक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिस आयुक्तालयाने निलंबित केले आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर लोकलमधील गार्डच्या बाजूच्या माल डब्यांमध्ये जहिरुद्दीन मुजाहिद हे बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी मिळाली. प्रवाशांनी त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करून घेण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने जहिरुद्दीन यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले. या मृत्यूचा तपास करण्यासाठी रेल्वे पोलिस आयुक्तालयाने तीन पथके नेमून स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. हार्बर मार्गावरील फुटेज तपासत असताना १५ फेब्रुवारीला दुपारी सव्वादोनच्या सुमारास जहिरुद्दीन यांनी शिवडी स्थानकात लोकलमध्ये प्रवेश केल्याचे व २.२२ मिनिटांनी ते रे रोड स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर उतरल्याचे आढळले. तब्येत खालावल्याने फलाटावरील आसनावर बसले असताना ते उजव्या बाजूला डोक्यावर कोसळले. यावेळी दुपारी ३.३५ वाजता स्थानक ड्युटीवरील रेल्वे पोलिस विजय खांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान महेश आंधळे यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले नाही. उलट नशेत असल्याचे समजून लोकलच्या मालडब्यात नेऊन ठेवले, अशी बाब सीसीटीव्हीच्या तपासातून स्पष्ट झाली.
रेल्वे स्थानकांवरील जखमी प्रवाशांना मदत करणे रेल्वे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र जखमी प्रवाशाची शहानिशा न करता लोकलच्या डब्यात ठेवून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका रेल्वे पोलिस आयुक्तालयाने या दोघांवर ठेवला. या बेजबाबदार कृतीमुळे बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली असून, दोघांचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याही पोलिस अंमलदाराने अशाप्रकारे जखमी व स्वतःची काळजी घेऊ न शकणाऱ्या प्रवाशांबाबत हलगर्जी व निष्काळजी केल्यास त्यांच्यावरही अशी कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.