नाशिक : पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. यासोबतच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलीस प्रशासन आपल्या कर्तव्याप्रती सदैव दक्ष राहून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त २० नवीन बोलेरो वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्याची व नागरिकांच्या सुरेक्षेची पोलीस प्रशासनावर महत्त्वाची जबाबदारी असते. यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण ७१ चारचाकी व दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी ३ कोटी ९ लाख ७२ हजार ८३० रूपयांचा निधीस मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी आज प्राप्त झालेल्या २० नवीन बोलेरो वाहनांच्या माध्यमातून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने व जलदपणे पोहचणे शक्य होणार आहे. नवीन वाहनांमुळे ग्रामीण पोलीस अधिक सक्षमतेने काम करू शकतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केला. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील पोलीस दलात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यावेळी सांगितले.