पुणे : नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सागर कुमार (वय २३), शिवम सरोज (वय २२, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. दोघांकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई केली.