पुणे : सोशल मीडियाच्या युगात वाचनाची सवय कमी होत असताना आणि मराठी साहित्यापासून नव्या पिढीचे अंतर वाढत असल्याची चर्चा होत असतानाच, जेजुरीतील चंद्रकांत रेडिकन यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग इंग्रजीत अनुवादित करून जगभर पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या ‘1000 डेज ऑफ तुकाराम’ या डिजिटल अभियानाला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत त्यांनी ६०० हून अधिक अभंगांचे इंग्रजी भाषांतर केले आहे. अभंगांचा केवळ अनुवादच नव्हे, तर त्यामागील तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये रोजच्या आयुष्यातील उदाहरणांसह इंग्रजीत समजावून सांगण्याची त्यांची शैली विशेष लोकप्रिय ठरत आहे. चंद्रकांत यांच्या वडिलांचे मूळ आयरिश-कॅनेडियन असून, ते सहजयोग आणि श्री माताजी निर्मला देवी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतात आले. त्यानंतर त्यांनी जेजुरीतील माधुरी सदाशिव अबनावे यांच्याशी विवाह करून येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून वडिलांनी चंद्रकांत यांना प्रभावी इंग्रजीचे शिक्षण दिले, तर आईचे संस्कार, जेजुरीतील खंडोबा मंदिरातील अभंग आणि पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा यामुळे त्यांच्या मनात अध्यात्माची गोडी निर्माण झाली. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असूनही त्यांनी मराठी संस्कृती आणि वारकरी परंपरेशी असलेले नाते जपले. सोशल मीडियावर त्यांच्या आडनावावरून काही जणांनी टीका केल्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘नावडे तरि कां येतील हे भांड…’ हा अभंग सादर करत संयतपणे उत्तर दिले. त्यांच्या मते, मराठी आणि इंग्रजी या विठ्ठलाचे दोन पाय असून, संत साहित्य जागतिक स्तरावर पोहोचविणे हेच त्यांचे ध्येय आहे.
चंद्रकांत रेडिकन यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग इंग्रजीत अनुवादित करण्याचा विचार २०१५-१६ मध्ये सुरू केला. एका अभंगाचा अचूक अर्थ आणि भावार्थ इंग्रजीत मांडण्यासाठी त्यांना सुरुवातीला सहा ते सात महिने लागले. त्यानंतर त्यांनी ‘50 डेज ऑफ तुकाराम’ या उपक्रमातून दररोज एका अभंगाचे इंग्रजी भाषांतर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रतिसाद मर्यादित असला तरी पुढे हा उपक्रम ‘1000 डेज ऑफ तुकाराम’ या मोहिमेत विकसित झाला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच परदेशात राहणाऱ्या मराठी तरुणांना संत तुकाराम महाराजांचे विचार सहज समजावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ते सांगतात. याशिवाय, जागरण-गोंधळ, धनगर गीत, पोवाडे आणि लोकसंस्कृतीतील प्रतिमा त्यांनी आपल्या इंग्रजी कवितांमध्येही प्रभावीपणे वापरल्या आहेत. भविष्यात या सर्व भाषांतरित अभंगांचे पुस्तक प्रकाशित करण्याबरोबरच ‘तुका म्हणे’ या नावाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचाही त्यांचा मानस आहे. संत तुकाराम महाराजांचे विचार डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचावेत, महाराष्ट्राचा समृद्ध साहित्यिक वारसा जागतिक स्तरावर अधिक व्यापक व्हावा आणि अभंगातील जीवनमूल्यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, संत साहित्याविषयीची ओढ आजही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.






