मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, दुसरीकडे रेल्वे खोळंब्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मध्य रेल्वेवरील परळ येथील अप जलद मार्गावरील सिग्नलमध्ये मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल विस्कळीत झाल्या. परिणामी, पहाटेपासून लोकल खोळंब्यामुळे नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे स्थानकांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. यासाठी ठाण्याच्या फलाट क्रमांक ५-६ चे रुंदीकरण आणि सीएसएमटी येथे फलाट क्रमांक १०-११ चे नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता. या ब्लाॅक काळात नियोजित कामे पूर्ण केल्याने मध्य रेल्वेने स्वतःची पाठ थोपटून घेतली. परंतु, दुसऱ्याच दिवशी सोमवारी पहाटेपासून सीएसएमटी स्थानकात नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. तसेच कोपर – दिवादरम्यानही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक पुरते कोलमडले.
लोकलचा वेग अत्यंत कमी झाल्याने लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. तर, परळ येथे मंगळवारी पहाटे ४.३० वाजता बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकल पुढे जात नसल्याने त्रस्त झालेले प्रवासी रुळावर उतरून पायी चालत निघाले. मुख्य मार्गावरील लोकल सुमारे ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. घटनास्थळी मध्य रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक तज्ञ समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.