नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल ६२.३६ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देशात विश्वविक्रम घडला आहे. कारण, या सात टप्प्यांत ६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. G7 मधील एकूण देशातील दीडपट अधिक तर, युरोपिअन युनिअनमधील २७ देशाच्या तुलनेत अडीचपट अधिक हे मतदान आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल ३१ कोटी १४ लाख महिला मतदार आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करताना आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ९६.६ कोटी मतदार आहेत. यामध्ये ४९.७ कोटी पुरुष मतदार आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. यापैकी एकूण ६४ कोटी २ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच, यंदा देशात ६२. ३६ टक्के मतदान झालं आहे. यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने निवडणूक आगोयाच्या आयुक्तांनी उभं राहून दाद दिली. जम्मू आणि काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. गेल्या चार दशकातील हे सर्वाधिक मतदान होतं, असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.