डोंबिवली : लोकल प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच महिला होमगार्ड देखील असुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. कसारा लोकलमध्ये वाशिंद ते आसनगाव स्थानका दरम्यान पेट्रोलिंग करत असताना नीरजा या होमगार्ड महिलेवर हल्ला करण्यात आला होता. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका माथेफिरूला त्यांनी हटकले होते. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी २४ तासात मारुती अत्राम याला अटक केली आहे.
लोकलमध्ये महिला सुरक्षेचा पुन्हा प्रश्न एकदा ऐरणीवर आला असून आता महिलेची सुरक्षा करण्याऱ्या महिला होमगार्डवरही हल्ला करण्यास सुरवात झाली. कसारा लोकलमध्ये वाशिंद ते आसनगाव स्थानकादरम्यान महिला रेल्वे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या नीरजा मुकादम हे आरक्षित महिला जनरल डब्यात पेट्रोलिंग करत असताना महिला डब्यात मारुती अत्राम नावाच्या आरोपीने प्रवेश केल्याने त्याला महिला डब्यातून उतरण्यास सांगितले. याचा राग मनात धरून महिला डब्यात प्रवास करणाऱ्या माथेफिरू मारुती अत्राम यांनी धावत्या ट्रेनमध्ये महिला होमगार्डला बेदम मारहाण करत वाशिंद स्टेशन येताच त्याने स्टेशनवरून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महिला होमगार्डने मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याला गांभीरत्याने घेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने त्याचबरोबर एपीआय देशमुख, पीएसआय जावळे, पोलीस शिपाई शेवाळे, खाडे, देसले, जाधव, देवळेसह इतर कर्मचाऱ्यांनी कल्याण ते कसारा पर्यंत सर्व स्टेशनवर आरोपीचा शोध काढत २४ तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले असून, सध्या या आरोपीने अश्या प्रकारच्या अजून काही घटना केल्यात का याचा तपास कल्याण जीआरपी पोलीस करत आहे.