मुंबई : मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाकडून शुक्रवारी, मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे पर्यावरण आणि वातवरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवांनी सूचित केले आहे. राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने मुंबई महापालिकेपाठोपाठ अन्य शहरे, ग्रामीण भागामधील प्रदूषण नियंत्रणासाठी शुक्रवारी ३१ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात प्रामुख्याने बांधकामांशी संबंधित सूचना आहेत. त्यासह, कचरा जाळणे, बेकरीतील ज्वलन, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार, हवा गुणवत्ता देखरेख केंद्रांची नियमित तपासणी, हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांमध्ये वाढ, जनजागृती मोहीम आदीसंदर्भातील सूचनांचा यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रातील ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान २५ फूट उंच कथील/धातूचे पत्रे बांधावेत, तसेच, महापालिका, महामंडळाच्या क्षेत्राबाहेर किमान २० फूट उंच कथील/धातूचे पत्रे बांधावेत, अशी अट आहे. मोठ्या शहरांमध्ये एक एकरापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांभोवतीही २५ फूट उंचीच्या पत्रे उभारावे लागतील. बांधकामाधीन सर्व इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कापडाने, ओल्या ताडपत्राने वा ताडपत्रीने बंदिस्त करण्याची सूचना आहे. पाडकामावेळी त्याचपद्धतीने बांधकाम झाकले जाणे अपेक्षित असून पाडकामावेळी सातत्याने पाणी शिंपडणे आवश्यक आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याची सूचना जिल्हाधिकारी, आयुक्तांना देण्यात आली आहे. कार्यस्थळाची चित्रफित काढणे, तरतुदींचे पालन न झाल्यास कारवाई, बांधकाम थांबवणे, बांधकाम ठिकाण सील करणे आदी कारवाईच्या सूचना आहेत. सूचना जारी झाल्यापासून १५ दिवसांत स्प्रिंकलर खरेदी आणि ३० दिवसांत स्मॉग गन खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणा बसवावी लागेल. ही वाहने झाकणे, ओव्हरलोड टाळणे, जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपचे धोरण, पीयूसी प्रमाणपत्राची आवश्यकता व्यक्त केली आहे. बांधकाम साहित्य सुनिश्चित क्षेत्रामध्ये टाकणे आवश्यक करण्यात आले असून, या क्षेत्राचे बॅरिकेडिंगही आवश्यक असेल अशी सूचना आहे. वाहनांचे टायर धुण्यासाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था बांधकाम साइटवर असणे अपेक्षित आहे, असेही त्यात म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला उद्योगांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागेमध्ये पालापाचोळा जाळण्यावर निर्बंध, डम्पिंग ग्राऊंडवर कचरा जाळण्यावर निर्बंध, महापालिका, नगरपरिषद क्षेत्रामध्ये पक्के फूटपाथ, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारामध्ये विद्युत-पर्यावरण अनुकूल इंधनाचा वापर आदी सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थापित केलेल्या हवा गुणवत्ता देखरेख केंद्राची महापालिकेकडून नियमित तपासणी होणे अफेक्षित आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत शहरांनी स्वतःच्या संसाधनांचा वापर करून हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे वाढवण्याची सूचना आहे.
-बांधकामाच्या ठिकाणी साहित्य चढवताना, उतरवताना पाण्याची फवारणी, अँटी स्मॉग गनचा वापर, राडारोड्यावर पाणी शिंपडणे.
-बांधकाम साहित्य वाहून नेणारे वाहन आच्छादित असणे, अतिरिक्त साहित्य न भरणे.
-बांधकाम क्षेत्रात सेन्सर आधारित वायू प्रदूषण मोजमापन यंत्रणा असावी.
-प्रदूषण निर्धारित पातळीहून अधिक असल्यास प्रतिबंधात्मक कारवाई.
-कटिंग, ड्रीलिंग, ट्रिमिंग अशी कामे बंदिस्त ठिकाणी करणे, तिथे पाण्याची फवारणी, फॉगिंग करणे, नियुक्त क्षेत्रात बांधकामाचा राडारोडा उतरवणे, वाहन धुवून स्वच्छ करणे.
-बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणात्मक उपकरणांचा वापर.
-सार्वजनिक बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी २० फुटांचे बॅरिकेडिंग.
-मेट्रोची कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडने झाकणे, बांधकामाची जागा हिरव्या कापडाने, ताडपत्रीने झाकणे.
– राडारोड्याचे अवैध डम्पिंग रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करणे.