पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना राबवत मोठे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ट्रस्टकडून तब्बल ६१ व्यावसायिक आणि कौशल्य विकासाचे कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन या कोर्सेसमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून, यामध्ये आता ‘ड्रोन टेक्निशियन’ या नव्या कोर्सची भर घालण्यात आली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष Mahesh Suryavanshi यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये देऊन त्यांना भविष्यासाठी तयार करण्यावर ट्रस्टचा भर आहे.
सध्या शेती, सर्वेक्षण, सुरक्षा, व्हिडिओ-फोटोग्राफी आणि उद्योग क्षेत्रात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत असून, प्रशिक्षित टेक्निशियनची मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझाइन, जिम ट्रेनर व न्यूट्रिशन, बिलिंग सॉफ्टवेअर तसेच यूपीएससीसारख्या विविध क्षेत्रांतील कोर्सेसही उपलब्ध आहेत. गणपती सदन येथे या सर्व कोर्सेसची माहिती दिली जात असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.






