मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा आणि स्वराज्याची भगवी पताका म्हणजे भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच शिवप्रतिमेचे पूजनही करण्यात येणार आहे. हा उपक्रम २६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यासंदर्भात पुण्यामध्ये घोषणा करण्यात आली. हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून आणि तमाम शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या सहभागातून साजरा होणार आहे. यासाठी किल्ल्यांची वेगवेगळ्या विभागांत विभागणी करण्यात आली आहे. विभागनिहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये महासंघाकडे नावनोंदणी करून या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे. याची नोंदणी प्रक्रिया, सविस्तर कार्यक्रम व इतर सर्व माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले. महासंघाच्या वार्षिक कार्यकारिणीमध्ये या उपक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव आणि सचिव डॉ. राहुल वारंगे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हिंदवी स्वराज्याच्या ३५० वर्षांनिमित्त जगभरात विविध उपक्रम शिवप्रेमी राबवणार आहेत. अशाच पद्धतीने ३५० गडकिल्ल्यांवर उपक्रम होणार असून यामुळे महाराजांचे स्वराज्य, त्याची साक्ष देणारे गडकिल्ले व साहसाची सांगड घालणारे कडेकपारीतील निसर्गसौंदर्य या सर्वांना एका धाग्यात गुंफता येणार आहे, असे झिरपे यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.