भिवंडी : अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाईच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असताना या अंमली पदार्थाच्या विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या एका महिलेला भिवंडीतील शांतीनगर पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. शबाना अन्वर कुरेशी असे अटक केलेल्या लेडी डॉनचे नाव आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र गेल्या वर्षभरात समोर आले आहेत. पोलिसांनी ड्रग्स माफियांच्या अड्ड्यावर छापेमारी करत त्यांना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे नशेच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीलाही यापासून रोखण्यासाठी नशामुक्ती अभियान पोलीस प्रशासनांकडून राबविण्यात येत आहे. तरी देखील काही नशेचे सौदागर भिवंडी शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीचा गोरखधंदा करीत असल्याची खबर शांतीनगर पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील अशोकनगर रोड भागात असलेल्या पोस्ट ऑफिस समोर रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवरून शबाना ही चरस विक्रीसाठी येत असल्याचे दिसली. यानंतर पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने रचलेल्या सापळ्यात शबाना सापडली, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीमधून २ किलो २ ग्रॅम वजनाचा ज्याची किंमत २० लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. शबानाला पोलिसांनी ताब्यात घेत चरस देखील जप्त केले आहे