पुणे : व्हॉटसअॅपचे डीपीला आयएएस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर आयएएस ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांसाठी सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे मारण्याची धमकी तिने दिली होती. रेणुका ईश्वर करनुरे (वय ३२, रा. सिद्धीविनायक सोसायटी, वडकी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडकी येथील एका ३१ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी या घरगुती व्यवसाय करतात. त्यासाठी रेणुका करनुरे यांच्याकडे येत होत्या. त्यांनी आपण आय ए एस असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी रेणुकाकडून सुरुवातीला दरमहा ५ टक्के दराने ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी २ लाख ६८ हजार रुपये घेतले होते. त्यावर दरमहा १० टक्के व्याजाप्रमाणे फिर्यादी यांनी आतापर्यंत एकूण ३ लाख ४८ हजार ६५० रुपये व्याज दिले. ऑनलाईन स्वरुपात दिले. ६० हजार रुपये व्याज रोख तसेच ३ लाख १० हजार रुपये वेळोवेळी १ लाख २५ हजार रुपयांची फिर्यादीची भिशीची रक्कम व २५ हजार रुपये फंडाची रक्कम दंड स्वरुपात तिला दिलेली आहे. अशाप्रकारे केवळ २ लाख ६८ हजार रुपयांपोटी त्यांनी ८ लाख ८ हजार ६५० रुपये दिलेले आहेत. असे असतानाही आणखी ४ लाख ५५ हजार ५९८ रुपये देणे बाकी असल्याचे ती म्हणत होती. व्हॉटसअॅपवर मेसेज करुन वेळोवेळी पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होती.
फिर्यादीने व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर प्रत्येक दिवशी ती २०० रुपये दंड घेत होती. एक महिना उशीर झाला तर केवळ दंडाचे ६ हजार रुपये वसुल करत होती. रेणुका करनुरे हिने ती रहात असलेल्या ठिकाणी आयएएस असल्याचे सांगत होती. तिने आपल्या व्हॉटसअॅपचे डीपीला आयएएस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवला आहे. पैसे न दिल्याने तिने फिर्यादीच्या पतीची कार जबरदस्तीने ओढून नेली होती. अडीच लाख रुपये दिल्यानंतर तिने ती परत केली होती. २५ जुलै रोजी रेणुका फिर्यादीच्या घरी आली. व्याजाचे पैशांची मागणी केली़. व्याजाची रक्कम तुम्ही नाही दिली तर मी आयएएस पदावर आहे, हे लक्षात ठेवा. मी पूर्ण सिस्टिम हालवून सगळ्यांना पैशांच्या जोरावर मॅनेज करेल. तुझा पती ट्रक ड्रायव्हर आहे. तुझ्या पतीचा अॅक्सिडेंट करुन त्यांना कायमचे संपवून टाकू शकते, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेऊन रेणुका करनुरे हिला अटक करुन तिचा भंडाफोड केला आहे. तिने आणखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत का याचा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करीत आहेत.