मुंबई : मराठी शाळा तसेच मराठी भाषेच्या शिक्षणावर पुन्हा एकदा बुलडोझर चालवण्याचे कारस्थान पालिकेकडून सुरू झाले आहे. गिरण्या जशा नोकरशहा, लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार यांच्या संगनमताने गिळंकृत झाल्या, तशीच शोकांतिका आता मराठी शाळांवर ओढवते आहे. माहीममधील न्यू माहीम स्कूल हे त्याचे ताजे आणि धक्कादायक उदाहरण आहे. याला विरोध करण्यासाठी आता मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या (रविवार ९ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता न्यू माहीम स्कूलच्या परिसरात आंदोलन व सभा आयोजित केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा प्रवास मराठी माध्यमातून आंतरराष्ट्रीय मंडळांकडे वळत असताना, ज्या काही मराठी शाळा तग धरून आहेत, त्या पाडून टाकण्याची मोहीमच सुरू झाली आहे. माहीमच्या मोरी रोडवरील जुन्या शाळेचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही; तरीसुद्धा जवळच्याच परिसरातील न्यू माहीम स्कूल ‘मोडकळीस आलेली’ म्हणून धोकादायक घोषित करण्यात आली आहे.







