मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी सुरू होण्यास उशीर झाला आहे, कारण ऐन दिवाळीच्या काळातही राज्यात पाऊस कोसळत होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा गारवा जाणवत आहे. थंडीची सुरुवात होत असतानाच, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. मान्सून राज्यातून परतला असतानाही, ‘मोंथा’ चक्रीवादळ दाखल झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे राज्यात मोठे थैमान माजले. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले, इतकेच नाही तर शेतातील मातीही वाहून गेली, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘मोंथा’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना बसला असला तरी, महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसून आले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणि पावसाच्या या बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
देशातील हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठे आणि जलद बदल होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत देशातील चार ते पाच राज्यांमध्ये हवामान सतत बदलत राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचे मोठे संकेत आहेत. केरळमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि रायमसिला या भागांमध्येही या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, देशाच्या ईशान्य भागामध्येही पावसाचे मोठे संकेत आहेत. या भागांमध्ये केवळ पाऊसच नव्हे, तर मोठे वादळ येण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, संबंधित राज्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







