ठाणे : राम मंदिर बनवणार पण, तारीख सांगणार नाही, असे काही लोक म्हणायचे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मंदिरही उभारले आणि तारीखही सांगितली, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षाला लगावला. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सूकता असून संपूर्ण देश राममय झाला असल्याचेही ते म्हणाले.
ठाणे शहरातील गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर अशी श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझीम, ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्री राम घोषणाबाजी सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची विट देऊन ती आयोध्याला पाठविली होती. त्यामुळे ठाण्याचे आणि अयोध्याचे एक जुने नाते आहे, असेही ते म्हणाले. राम मंदिर हा विषय अस्मिता, श्रद्धेचा आहेच पण, त्याचबरोबर देशाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. भव्य राम मंदिर तयार झाले आहे. हे मंदिर २२ जानेवारीला रामभक्तांसाठी खुले होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात उत्साह आहे, असेही ते म्हणाले.