मुंबई : मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस घसरत असल्याने वाहतूक पोलिसांनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. वर्षभरामध्ये वाहतूक पोलिसांनी ५२ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर ई-चलान जारी केले असून तब्बल एक कोटी ४१ लाख ५९ हजार इतका दंड वसूल केला आहे. पीयूसी प्रमाणपत्र नसणे, बांधकाम साहित्याची असुरक्षित ने-आण तसेच सायलेन्सरमध्ये फेरफार करून प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असल्याने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हवेचा दर्जा खालावण्यामागे वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कारणीभूत ठरत असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे आणि विकासकामे हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. ही बांधकामे आणि विकास कामाच्या ठिकाणी रेडिमिक्स, काँक्रीट भरून नेताना ट्रक, मिक्सर आच्छादित केले जात नाहीत. हे सर्व रस्त्यावर पडते, हवेत उडत असल्याने प्रदूषण होते. अनेक वाहनचालक वाहनांची तपासणी पीयूसी प्रमाणपत्र घेत नाहीत. दुचाकीवर लक्ष वेधण्यासाठी चालक सायलेन्सरमध्ये फेरफार करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण करणाऱ्या ५२ हजार ७९८ वाहनांवर जानेवारी २०२३ ते डिसेंबर आतापर्यंत ई चलान जारी करण्यात आले आहेत. या चलनाच्या माध्यमातून पोलिसांनी वाहन चालकांकडून एक कोटी ४१ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोलिसांकडून प्रदूषणकारी वाहनांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेमध्ये वाहतूक पोलिसांनी महिनाभरात १९ हजार ५५० वाहनांवर ई-चलान जारी केले आहेत. प्रदूषण करणाऱ्या या चालकांकडून ३९ लाख १५ हजार ५०० रुपये दंडवसुली करण्यात आली आहे. आमची कारवाई वर्षभर सुरू असते. मात्र प्रदूषणाचा स्तर घसरल्याने ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. यापुढेही याच पद्धतीने कारवाई सुरू राहणार असल्याने चालकाने आपली वाहने सुस्थितीत आहेत का, याची खात्री करून घ्यावी.
महिनाभरातील ई चलान कारवाई
पीयुसी असुरक्षित वाहतूक सायलेन्सरमध्ये फेरफार एकूण
१३८४५ ३२९७ २४०८ १९५५०
दंड : ३९,१५,५५० रुपये
वर्षभरातील ई चलान कारवाई
पीयुसी असुरक्षित वाहतूक सायलेन्सर मध्ये फेरफार एकूण
२८९२५ १०१८८ १५६८५ ५२७९८
दंड : १,४१,५९,००० रुपये