ठाणे : बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून बदनाम झालेल्या दिवा परिसरातील १७ बेकायदा इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर भूमिका घेतल्याने शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर स्वत: मुंब्रा येथील शीळ भागात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली.
मुंब्रा बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी व आरिफ एस. डॉक्टर यांनी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्यांना सकाळीच आयुक्त राव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयीन अधिकारी सकाळी महापालिका मुख्यालयात गेले. तेथून आयुक्तांसमवेत बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी सुरू केली. त्यानंतर त्या इमारतींवर कारवाईही करण्यात आली. संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शीळ-डायघर येथील लकी कंपाउंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गना सातत्याने केल्या गेल्या. प्रत्यक्षात मात्र हा परिसर बेकायदा बांधकामांनी गजबजलेला आहे. या पार्श्वभूमीवर शीळमधील १७ बेकायदा इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी देत असताना गुरुवारी उच्च न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या इमारतींची पहाणी करावी आणि अहवाल सादर करावा , असे आदेश दिले. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना शुक्रवारी सकाळीच शीळच्या दिशेने कूच करणे भाग पडले.







