डोंबिवली : डोंबिवलीजवळ खोणी गाव हद्दीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या दावडी गावातील एका इसमाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईवरून मानपाडा पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. या इसमाकडून गॅस सिलिंडर टाक्यांसह १४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
राज मोती यादव (४४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. ते डोंंबिवली पूर्वेतील दावडी गाव हद्दीतील तुकाराम चौकातील जयराम गॅलेक्सी इमारतीत राहतात. कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना दावडी येथील एक इसम घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस एका यंंत्राच्या साहाय्याने वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये भरून त्या सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचे हे केंद्र काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीतील तळोजा एमआयडीसी रस्त्यावर पायऱ्याचा पाडा येथे आहे. कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी, मानपाडा पोलीस आणि अन्न आणि शिधावाटप विभागाचे अधिकारी यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे खोणी गाव हद्दीतील पायऱ्याचा पाडा येथील राज यादव यांच्या सिलिंडरच्या काळाबाजार होत असलेल्या केंद्रावर गुरुवारी संध्याकाळी छापा टाकला. त्यांचे बेकायदा उद्योग उघडकीला आणले.







