वूत्तसंन्था : टी-२० वर्ल्ड कप २०२४ सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे. त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता. नुकतेच टीम इंडियाचा भाग असलेले तीन मोठे चेहरे केएल राहुल शिवाय रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांना भारतीय संघातून वगळण्यात आले आहेत. मात्र, बीसीसीआयने रिंकू आणि शुभमनला राखीव ठेवले आहे. रिंकूपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आले आहे. हार्दिकची निवड झाली तर शिवम-रिंकूपैकी एकालाच संधी मिळेल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचवेळी यशस्वी आणि शुभमन या दोघांपैकी एकाला संधी द्यावी लागली. निवडकर्त्यांनी शुभमनपेक्षा यशस्वीला प्राधान्य दिले आहे.
निवड समितीने ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक म्हणून संधी दिली आहे. कार अपघातानंतर पुनरागमन करत पंतने या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. त्याचवेळी, सॅमसनच्या कामगिरीमुळे राजस्थान संघ आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह राहुल, जितेश आणि इशान यांसारख्या यष्टीरक्षकांमधील शर्यतीबाबतच्या अटकळांनाही पूर्णविराम लागला.
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ (India Squad for टी-२० वर्ल्ड कप २०२४) : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
(टीम इंडियाचे टी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक)
- ५ जून – टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड
- ९ जून – टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
- १२ जून – टीम इंडिया विरुद्ध यूएएसए
- १५ जून – टीम इंडिया विरुद्ध कॅनडा