मुंबई : मुंबईत टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री-बेरात्री भाडं नाकारले जाणे असो किंवा मग जवळचे भाडे नाकारणे असो यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला सामोर जावे लागते. सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकाबाहेर लांबपल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असून त्या मुजोर टॅक्सी चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. एका प्रवाशाने वाहतूक पोलिसांच्या एक्स अकाउंटवर टॅक्सी चालकाबाबत तक्रार केली आहे. त्यामध्ये नागपूर दुरांतो ट्रेन सारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून टॅक्सी चालक जादा भाडे आकारत आहे. सीएसएमटी ते गोल देऊळ मंदिर येथे जाण्यासाठी २०० रे २५० रुपयांची मागणी करत आहेत. तर अन्य एका प्रवाशाने सांगितले कि, दादर रेल्वे स्थानकाबाहेर सातत्याने भाडे नाकारले जात आहे. मीटरचे भाडे नाकारून मनमानी भाडे मागितले जाते. एक किमी च्या अंतरासाठी ७० रुपयांची मागणी केली. जेव्हा त्या प्रवाशाने व्हिडीओ काढला त्यावेळी मीटर चालत नसल्याचे सांगून सारवासारव केली.
टॅक्सी चालकांनी भाडे नाकारले तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. रिक्षा टॅक्सी चालक अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. या बद्दलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. परंतु तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढे येत नाहीत. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांची मुजोरी वाढली आहे. मुंबईतील आरटीओ कार्यालयांनी इमेल आयडी आणि व्हाट्स अप क्रमांक दिल्याने प्रवासी तक्रारीसाठी पुढे येत आहेत.त्यांनतर कारवाई होऊनही टॅक्सी चालकांना फरक पडत नाही.