पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर परिसरात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी पुणे शहर परिसरात ड्रग्स प्रकरणी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ३ ड्रग्स तस्करांना देखील अटक केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या खबरीमार्फत माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणावर एमडी हा ड्रग पुण्यामध्ये येणार आहे.
त्यानुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास ४ कोटी रूपयांचे २ किलो एमडी जप्त केले आहे. ही मोठी कारवाई केल्यानंतर पोलिस सखोल तपास करत आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास करत आहेत. दरम्यान, याआधी ललित पाटीलकडून वेगवेगळे ड्रग्स आणले जात होते. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं. त्यानंतरही अशा प्रकारे ड्रग्स आणले जात होते, त्यापैकी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे.