पुणे : शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या. येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. भोरी चाळ, पांडू लमाण वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.
लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकरणी करण विजय दोरकर (वय १९, रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब ओैटी (वय १८, रा. मुंजाबा वस्ती, लोहगाव), तसेच दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल अनंत कानू (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोरकर, ओैटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी जुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली. सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल तपास करत आहेत.