पिंपरी : हिंजवडी परिसरात बनावट चलनी नोटा घेऊन जाणाऱ्या दोन युवकांना हिंजवडी पोलिसांनी बेडया ठाेकल्या. त्यांच्या ताब्यातून पाेलिसांनी जवळपास १ लाख १० हजार रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या संशयितांनी त्यांच्या घरातच बनावट नोटा छापल्या असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अभिषेक राजेंद्र काकडे आणि ओमकार रामकृष्ण टेकाम यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिषेक राजेंद्र काकडे, ओमकार रामकृष्ण टेकम आणि एक अल्पवयीन मुलाच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये (भादवी 489 क आणि 34 कलमानुसार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.